खैरेंना झाली शिंदे मुख्यमंत्री होण्याची घाई तर कार्यकर्त्यांच्या मनात रामदास भाई !

Foto
औरंगाबाद: शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेते आणि कार्यकर्त्यांमधील दरी स्‍पष्‍टपणे दिसून आली.  पालकमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा व्यासपीठावरून खैरे देत असताना रामदास कदम पालकमंत्री असते तर खैरे यांचा पराभव झाला नसता अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

 लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन आठवडे लोटले तरी खैरेंच्या पराभवाची चर्चा सुरूच आहे. काल शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जंगी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला शहर तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते. नवे पालकमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा खैरे व्यासपीठावरून देत असताना कार्यकर्ते मात्र रामदास कदम यांच्या नावाची चर्चा करीत होते. कदम पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील दलित तसेच मुस्लिम कार्यकर्त्यांना बळ दिले होते. एमआयएमचे आमदार जलील यांना तब्बल कोट्यवधींचा निधी पालकमंत्र्यांनी दिला. तर दलित कार्यकर्त्यांनाही अत्यंत सन्मानाने वागविले. कदम जर पालकमंत्री असते तर एमआयएमला पायबंद घातला गेला असता असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटला. एकंदरीत नेत्याच्या मनात शिंदे तर कार्यकर्त्यांच्या मनात कदम असे चित्र दिसून आले.